HomeUncategorizedतीन दिवसात दोन नामवंत पुरस्काराने मुख्याध्यापिका मुनव्वर सुलताना सन्मानित

तीन दिवसात दोन नामवंत पुरस्काराने मुख्याध्यापिका मुनव्वर सुलताना सन्मानित

बीड : शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोशनपुरा येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका शेख मुनव्वर सुलताना मुहम्मद युसूफ़ यांना १५ सप्टेंबर रोजी रोटरी क्लब तर्फे तर १७ सप्टेंबर रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अवघ्या तीन दिवसात दोन नामवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रासह समाजातील सर्व स्तरातून मुनव्वर सुलताना यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
समाजातील कोणतेही क्षेत्र असो त्यात संधी मिळाल्यास सामाजिक जाणीव असलेले आणि आपण समाजाचे काही देणे लागतो हा ध्यास सतत मनात ठेवून मार्गक्रमण करणारे लोक त्या संधीचे सोने करतात. अशाच लोकांमध्ये बीड शहरातील बालेपीर भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोशनपुरा येथे कर्तव्यरत असलेल्या मुख्याध्यापिका मुनव्वर सुलताना या मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणाऱ्या मुख्याध्यापिका म्हणून शिक्षण क्षेत्रात वेळोवेळी नावाजल्या गेल्या आहेत.
मुनव्वर सुलताना या चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या एका सधन कुटुंबात जन्मल्या. यामुळे त्यांना शिक्षण घेण्यात घरूनही चांगले प्रोत्साहन मिळाले. शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून नोकरी करण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यांचे प्रयत्न २९ नोव्हेंबर १९८५ रोजी फळास आले आणि बीड शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या जिल्हा परिषद च्या शाळेत त्यांना सहशिक्षिका पदी नियुक्ती मिळाली. जेव्हा त्या या शाळेत रुजू झाल्या तेव्हा तेथे पहिलीचा एकमेव वर्ग भरत होता. मात्र त्यांनी अल्पावधीतच आपल्यातील असलेले अंगभूत गुण आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देत इयत्ता पहिलीच्या तीन तुकड्या केल्या. त्यांच्या या कार्याची शिक्षण विभागाने नोंद घेत त्यांची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची येथे बदली केली.
प्राथमिक नंतर माध्यमिक शाळेत नियुक्ती झाल्याने त्यांच्यातील शिक्षिकेने प्राथमिक पेक्षा वयाने थोडे मोठे असलेल्या माध्यमिक च्या विद्यार्थ्यांना शिक्षणासह सांस्कृतिक कार्यक्रमाची गोडी लागावी म्हणून शाळेत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. माध्यमिक शाळेत त्यांनी २५ सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या कार्यकाळात घेतले. याला समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्तपणे दाद मिळाली. शिवाय लोकांकडून देणगी रुपात २० हजार रुपयांची राशी सुद्धा शाळेस मिळाली.
माध्यमिक शाळेतील त्यांच्या कार्याची नोंद घेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने त्यांना २८ डिसेंबर २०११ रोजी मुख्याध्यापिका पदी पदोन्नती दिली आणि त्या गेवराई तालुक्यातील गढी या गावी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाल्या. तिथेही त्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कार्याने तीन वर्षे शिक्षणासह अनेक वेगवेगळे कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले.
गढी येथून त्यांची २०१४ साली मादळमोही येथील शाळेत बदली झाली तेथे ही त्यांनी २०१६ सालापर्यंत कर्तव्य बजावले.
मादळमोही नंतर २०१६ साली त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोशनपुरा येथे बदली झाली. तेव्हापासून आजपर्यंत त्या या शाळेत मुख्याध्यापिका पदावर कार्यरत असून जेव्हा या शाळेत बदली होऊन रुजू झाल्या होत्या, तेव्हा तिथे फक्त इयत्ता सहावी पर्यंतचे वर्ग होते. येथेही त्यांनी आपल्यातील उत्कृष्ट शिक्षिकेची चुणूक दाखवून देत शिक्षणासह सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही योग्य नियोजन करून आपल्या कर्तव्य तत्परतेने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत इयत्ता सातवी व आठवी असे दोन नवीन वर्ग शाळेत सुरू केले. आता या शाळेत त्यांच्यामुळे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत चे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत असून यापुढे इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी ही शिक्षण विभागाकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
शिक्षणासह सामाजिक कार्यातही धडपड
शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी ला १९८९ साली महापूर आल्यावर नदी पात्राच्या मधोमध वसविलेले संपूर्ण बुद्ध भेट वाहून गेले होते. त्यावेळी आपले सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मुनव्वर सुलतानांनी पुढे येऊन मोठ्या धडाडीने पूरग्रस्त नागरिकांची आपल्या पातळीवर होईल तेवढी सढळ हस्ते मदत केली होती. याची नोंद घेत त्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले होते.
इतर उपक्रमातही धडाडीचा सहभाग
सहशिक्षिके पासून ते मुख्याध्यापिका पदापर्यंत कार्य करत असताना त्या नेहमी १००% पटनोंदणी आणि १००% उपस्थिती साठी नेहमी आग्रही असतात. नव्हे ते विद्यार्थ्यांसह पालकांना सुद्धा आपल्या समुपदेशनाने शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगत या दोन्ही बाबी पूर्ण करतात. दर्जेदार शिक्षण, सर्व प्रशिक्षण, पल्स पोलिओ लसीकरण, जनगणना, मतदान ड्युटी, बेटी बचाव-बेटी पढाव उपक्रमात सुद्धा उल्लेखनीय कार्य करतात. तंबाखू मुक्त शाळा, बाला बाला उपक्रम, डिजिटल शाळा, माझी सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत वृक्षलागवड, सांस्कृतिक कार्यक्रम, साक्षरता अभियान, डंगरी शाळा म्हणजेच आताचे निरंतर शिक्षण साठी सुद्धा विशेष कार्य करतात. त्यांच्या अशा चौफेर कार्यामुळे त्यांना शासनाकडून एक अतिरिक्त इन्क्रिमेंट सुद्धा मिळाले आहे.
अशा या हरफनमौला मुख्याध्यापिकेला नुकतेच १५ सप्टेंबर २०२१ रोजी नामवंत अशा रोटरी क्लब कडून तर १७ सप्टेंबर २०२१ रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बीड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह अन्य उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित होते. मुनव्वर सुलतानांनी हा पुरस्कार आपल्या दोन्ही मुलं, मुली आणि जावया सोबत स्वीकारला. अशाप्रकारे त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीची नोंद घेत अवघ्या तीन दिवसात दोन नामवंत पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर शिक्षण क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून या दोन्ही नामवंत पुरस्कारामुळे त्यांची जबाबदारी आणखीन वाढली आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments