आष्टी / पठाण शाहनवाज
आष्टी तालुक्यातील पिंपळगाव दाणी येथील ग्रामस्थ व विद्यार्थी यांची गैरसोय टाळण्यासाठी मेहेकरी नदीवर मोठा पुल बांधण्यात यावा अशी मागणी लोणी गटातील सामाजिक कार्येकर्ते अमोल काकडे, पिंपळगाव दाणी येथील युवक कार्येकर्ते गोवर्धन ढगे अक्षय खराडे,बंडु ढगे व इतर ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील सर्वात जुने व मोठे धरण म्हणून मेहेकरी धरणाची ओळख आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण भरून वाहू लागले आहे. सांडव्यावरून पाणी वहात असल्याने मेहेकरी नदी भरुन वाहते आहे. पिंपळगांव दाणी येथील विद्यार्थ्यांना मेहेकरी येथे शाळेत जावे लागते. त्यांना मेहकरी अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. परंतु त्याऐवजी अगोदर आनंदवाडी येथे जाऊन कॅनल मार्गे मेहेकरी येथे सात किलोमीटर अंतर दूरवरून वळसा घालून जावे लागते. तसेच पिंपळगांव दाणी येथील ग्रामस्थांना नोकरी, उद्योग-धंद्यासाठी कडा-आष्टी येथे जावे लागते. सर्व ग्रामस्थांना दुरवरून म्हणजे पुंडी, धानोरा या मार्गे कडा येथे जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होतात. वेळेचा अपव्यय तर होतोच शिवाय गगणाला भिडलेले डिझेल-पेट्रोलचे दर यामुळे खिशाला देखील कात्री लागते. आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. एखाद्याचे अचानक दुखायला लागले तर जाण्याचा तातडीचा मार्ग बंद असल्याने दुरून जाईपर्यंत पेशंट दगावण्याची भीती असते. त्याकरिता हे सर्व टाळण्यासाठी प्रशासनाने मेहेकरी ते पिंपळगांव दाणी दरम्यान असलेल्या मेहेकरी नदीवर मोठा पुल बांधावा आणि साधारण एक किलोमीटर पक्का रस्ता करावा ही जनसामान्यांची मागणी आहे. यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल.
जाहिरात 👇👇👇
ताज पॅलेस & हॉल