आष्टी / पठाण शाहनवाज
शासन आदेशाने दि.४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू झाल्या आहेत. यामुळे शाळांचा परिसर बालगोपाळ विद्यार्थ्यांच्या आगमनाने फुलून गेला आहे. गेल्या दीड वर्षांपासून कुलूपबंद असणारे वर्ग मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेले असल्याने शिक्षक वर्गाच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू दिसून येत आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अतूट नाते या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून ज्ञानदानाचे कार्य पार पाडण्यासाठी आसुसलेले गुरुजन विद्यार्थ्यांना पाहून गलबलून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आगमनाने शाळा हसली मुलं हरकली अशीच चर्चा उपस्थित पालकवर्गात सुरू होती. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीच्या कारणास्तव शासनाने सर्वच विद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी पर्याय म्हणून ऑनलाइन तास मोबाईलच्या माध्यमातून घेतले जात होते. परंतु प्रत्यक्षात आणि ऑनलाइन शिक्षण यामध्ये प्रचंड मोठी तफावत असल्याने विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा बराचसा वेळ यामध्ये वाया जात होता. शिवाय मोबाईल वापराचे अनेक दुष्परिणाम असल्याने पालकांना जागरूक राहून मुलांबरोबर सतर्क राहावे लागत असल्याने पालकांचा इतर कामाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नव्हता. घरातील वडीलधारी माणसांच्या प्रेमाखातर मुले अभ्यास करताना टाळाटाळ करीत असत यामुळे पालकवर्ग मेटाकुटीला आला होता. परंतु शाळा सुरू झाल्याने प्रत्यक्ष शिक्षण तेही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिळणार असल्याने पिंपळा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील सर्व शाळा त्यांमध्ये पिंपळेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळा व काकडवाडी या ठिकाणी पालकांची पूर्वसंमती घेऊन ग्रामस्थांचा सहभाग दाखवून मुलांचं नुकसान टाळण्यासाठी पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी ऑक्सी मिटर, तापमान गणक, सॅनिटाईझर,डेटॉल साबण, मास्क,हे अत्यावश्यक साहित्य ग्रामपंचायत कार्यालय पिंपळा मार्फत सर्व शाळांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच सीमाताई भवर, उपसरपंच रामदास (आण्णा )शेंडगे, शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब भिटे,ग्रामपंचायत सदस्य संदिप लिंबोरे, सतीश अरुण, राहुल लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते सुखदेव लोखंडे,युवा नेते अमोल काकडे, विलास खटके, तोसिफ सय्यद,व महेबूब जवान साहेब, डॉ. शेंडगे व गावातील ज्येष्ठ नागरिक पालक युवक मित्र व मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी मित्र कोरोना चे नियम पाळून उपस्थित होते.
जाहिरात 👇👇👇