बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )
महाड पोलादपूर मध्ये उद्भवलेल्या पूर्णपरिस्थितीमुळे आलेल्या महासंकटामध्ये संवेदनशील मनाने धावून गेलेल्या माणगाव तालुक्यातील सर्व मंडळांचा छावा प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम तरुणांचे स्फुर्तीस्थान, युवानेते, छावा प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश थोरे व छावा प्रतिष्ठान च्या सहकार्यानी हाती घेतला आहे.
या बाबत बोलताना छावा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष निलेश थोरे यांनी सांगितले कि,महाड-पोलादपूर ला जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या दोन्ही तालुक्यातील शेती,स्थावर व जंगम मालमत्तेचे व करोडो रुपयांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तर तळीये आणि सुतारवाडी सारख्या ठिकाणी दरड कोसळून अनेक नागरिकांना आपल्या कुटुंबासह आणि घरादारासह आपला जीव गमावावा लागला होता.महाड शहरामध्ये तर पंधरा फुट पाणी चढल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे हजारो नागरिकांना दोन वेळचे अन्न देखील मिळत नव्हते, अश्यावेळी ह्या दोन्ही तालुक्यांना केवळ रायगड जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण राज्य व परराज्यामधून देखील हस्ते परहस्ते मदतीचा ओघ सुरु होता. दोन्ही तालुक्यांच्या लगत असणाऱ्या माणगांव तालुक्यातील शेकडो युवक मंडळ,ग्रामस्थ तसेच महिला मंडळ, अनेक संघटना व व्यक्तिशः देखील अनेकांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पूर व दरडग्रस्त जनतेला ताजे अन्न, किराणा साहित्य,औषधे,कपडे, जीवनावश्यक वस्तू अश्या विविध स्वरूपात पहिल्या दिवसापासून जाऊन मदत दिली. ही मदत करताना कोणतीही अपेक्षा किंवा प्रसिद्धीसाठी न करता प्रत्येकाने निःस्वार्थ भावनेने केलेली मदत ही नक्कीच कौतुकास्पद आहे. आपली कामे बाजूला ठेऊन,स्वतःच्या खिशाला कात्री मारून माणगाव तालुक्यातील नागरिकांनी केलेली ही मदत सगळ्यांच्याच कायम स्मरणात राहील व ह्या माणुसकीच्या नात्याने केलेल्या सहकार्याचा सन्मान कुणीतरी नक्कीच केला पाहिजे ह्या भावनेने आम्ही छावा प्रतिष्ठान च्या माध्यमातून माणगाव तालुक्यातील सर्व मंडळाचा यथोचित सत्कार थेट प्रत्येकाच्या गावांत जाऊन शनिवार दिनांक 16 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 17 ऑक्टोबर अश्या दोन दिवासीय तालुका दौऱ्यात करणार आहोत.
महाड पोलादपूर तालुक्यातील जनता स्थिरावल्यानंतरच सदर सन्मानसोहळा करायचे ठरले असल्याने व दसऱ्याच्या सिमो्लंघनाच्या शुभमुहूर्तावर महाड पोलादपूरच्या विकासाचे देखील सीमोल्लंघन व्हावे अशी प्रार्थना करून सदर उपक्रमाची सुरुवात करणार असल्याचे छावा प्रतिष्ठान चे संस्थापक निलेश थोरे यांनी सांगितले. दरम्यान छावा प्रतिष्ठान ने माणगाव तालुक्यातील मंडळाशी संपर्क करून त्यांची माहिती गोळा केलेली आहे तरी आणखी कुणी नाव नोंदणी करायचे राहिले असल्यास आम्हाला संपर्क करावा असे आवाहन छावा प्रतिष्ठान मार्फत केले आहे.