बीड (प्रतिनिधी) – अलीकडच्या काळात बीड जिल्ह्यामध्ये करण्यात येत असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या पाहता ते अलादीनचे जीन नाहीत असे उद्विग्न मत मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून नमूद केले आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, जिल्ह्यात अलीकडे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या अचानक व तडकाफडकी बदल्यांची बाब वारंवार होऊ लागली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यामागे नेमके काय कारण आहे ? अधिकारी चुकले का ? त्यांनी भ्रष्टाचार केला का ? शासन नियमाप्रमाणे त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला का ?अशा कारणांपैकी नेमके कोणत्या कारणामुळे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली ? हे आता एक गौडबंगाल होत चालले आहे. अधिकाऱ्यांची नियुक्ती होणे व बदली होने हे क्रमप्राप्त व शासन अखत्यारीत असले तरी अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे कालावधी पूर्ण होण्याअगोदर फक्त एकट्या त्याच अधिकाऱ्याबाबत विचार केला जातो का ? त्यांचे कौटुंबिक जीवन, त्यांचे शिक्षण घेणारे मुलं-मुली यांच्याविषयी विचार करण्यात येतो का ? माञ अशाप्रकारे अचानक अवलंबविल्या जात असलेल्या बदली चक्राकडे पाहून शासन ते करत नसल्याचा प्रत्यय निदान बीड जिल्ह्यात तरी आता वारंवार येऊ लागला आहे. अशाच प्रकारे २९ डिसेंबर २०२२ रोजी बीड नगर परिषद चे तत्कालीन मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांची अवघ्या सात महिन्यात कुठलेही कारण न देता अचानक बदली करण्यात आली आणि नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे उमेश ढाकणे हे वर्ग एकचे अधिकारी होते तर त्यांच्या जागी नियुक्ती देण्यात आलेल्या नीता अंधारे या वर्ग दोन च्या अधिकारी आहेत. तरीसुद्धा नियम डावलून त्यांना बीड नगर परिषद च्या मुख्याधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले. मात्र बदली करण्यात आलेले उमेश ढाकणे यांना दीड महिन्यानंतर ही आजपर्यंत कुठेही नियुक्ती देण्यात आली नाही. यामुळे वर्ग एक सारखे अधिकारी असूनही त्यांना एवढ्या मोठ्या कालावधीत घरीच बसून राहावे लागत असल्याने आता त्यांनी मॅट मध्ये धाव घेतली असून या सर्व कायदेशीर बाबी मांडून शासन निर्णयाविरोधात शड्डू ठोकले आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू असतानाच आता जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांचीही अशाच प्रकारे दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ मंगळवार रोजी अचानक बदली करून दीपा मुधोळ मुंडे यांची बीड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राधा बिनोद शर्मा यांनाही फक्त बदलीचे आदेश देण्यात आले असून त्यांचीही अन्य ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली नाही. आता त्यांचीही या बदलीनंतर कुठे ? कधी ? व कशाप्रकारे नियुक्ती होते ? हे येत्या काळात दिसून येईलच. मात्र बीडमध्ये पहिल्यांदाच दोन उच्च पदस्थ अधिकारी म्हणून आता नीता अंधारे आणि दीपा मुधोळ मुंडे या महिला अधिकारी म्हणून कर्तव्य बजावतांना दिसणार आहे. या बाबी शासकीय-प्रशासकीय स्तरावर शासन करत असले तरी या पदापर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांना मोठ्या अग्नीदिव्यातून जावे लागते. आपली बौद्धिक गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर अधिकारी होता येते. उमेदवार असलेली ही माणसं एकदा का अधिकारी म्हणून रुजू झाली की यांच्याबाबत निर्णय घेणारे शासन कधीही व कसेही आदेश देऊन मोकळे होतात. मग त्या निर्णयाचा त्यांच्या कारकिर्दीवर, आयुष्यावर, कुटुंबावर काहीही परिणाम होवो. याच्याशी बहुतेक शासनाचे काहीही देणे घेणे नसते. शासनाने लक्षात घ्यावे की, अधिकारी सुद्धा माणसंच असतात. अलादीन चा जीन नव्हे, जो क्षणात कुठेही जातो आणि जे पाहिजे ते करू शकतो. असे उद्विग्न मत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.
उच्चपदस्थ अधिकारी अलादीनचे जीन नाहीत – एस.एम.युसूफ़.!
RELATED ARTICLES