HomeUncategorizedजिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे क्रीडा संकुलाकडे दुर्लक्ष !

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे क्रीडा संकुलाकडे दुर्लक्ष !

बीड – शहरातील एकमेव असलेल्या क्रीडा संकुलात ५ ते १५ वयोगटातील प्रशिक्षणार्थींना तायक्वांदो चे प्रशिक्षण देणाऱ्या विभागात लावलेल्या लाकडी फळ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठ्या प्रमाणात तुट-फूट झालेली आहे. यामुळे प्रशिक्षण घेता-घेता प्रशिक्षकांच्या गैरहजेरीत किंवा नजर चुकून जर लहान मुले व मुलींना दुखापत झाली किंवा काही अघटीत घडले तर याची जबाबदारी घेणार कोण ? असा प्रश्न येथे पाहणी केल्यानंतर मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी उपस्थित केला असून याकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, बीड शहरात अगोदरच क्रीडा संकुल आणि उद्यानांची वाणवा आहे. याला कारणीभूत आहे ते येथील राजकीय पुढारी आणि त्यांचे धोरण. येथे पक्ष कोणताही असो, नेता कोणताही असो, त्यांना फक्त निवडून येईपर्यंत शहराचा व जिल्ह्याचा विकास करावासा वाटतो. निवडणुकांच्या प्रचारात जिल्हाभरातील सर्व पुढारी फक्त आपआपल्या तोंडातून विकासाच्या वाफा मोठ्या प्रमाणात सोडतात आणि एकदा निवडून आले की, मग “या शेख अपनी देख” आणि “भर अब्दुल्ला गुड थैले में” सारखे यांचे वर्तन असते. पुढारी व नेत्यांच्या अशा धोरणामुळेच बीड जिल्ह्यासह बीड शहराची प्रगती ऐवजी मोठ्या प्रमाणात अधोगती झालेली आहे. याला आता बीड शहरात असलेले एकमेव क्रीडा संकुल सुद्धा अपवाद राहिलेले नाही. तायक्वांदो सारख्या खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत असलेल्या विभागात ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुले-मुलींना जिथे प्रशिक्षण दिले जाते तिथे जमिनीवर लावलेल्या लाकडी पट्ट्यांचा पार बोऱ्या वाजला आहे. काही फुगून मोठमोठे उंचवटे तयार झालेत तर शेकडो लाकडी पट्ट्यांचे अक्षरशः तुकडे झालेले आहेत. ज्यात प्रशिक्षकांच्या गैरहजेरीत किंवा नजर चुकवून लहान मुले-मुली पडले तर कोणतीही मोठी अघटीत घटना घडू शकते. लाकडी पट्ट्या तुटल्यामुळे अनेक ठिकाणी भोक पडलेले आहेत. ज्यात हात-पाय अडकून दुखापत होऊ शकते. तुटलेल्या पट्ट्या डोळ्यात पोटात घुसू शकतात. अपघात झाल्यास नेमके काय होईल ते सांगता येणार नाही. मोठ्या प्रमाणात तुटलेल्या पट्ट्यांच्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी मुला-मुलींना दुखापत होऊ नये म्हणून रबरी मॅट टाकलेल्या दिसून आल्या. मात्र याचे गांभीर्य बीड जिल्हा क्रीडा अधिकारी यांना असल्याचे दिसत नाही. मात्र काही अघटीत घडले तर जबाबदार कोण ? असा प्रश्न मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments