बीड (प्रतिनिधी) – स्वर्ग मिळावे म्हणून नमाज़साठी मशीदीत जाण्यापूर्वी नमाज़ींना नरक यातनेचा अनुभव येत असल्याने बीड नगर परिषद चे मुख्याधिकारी ढाकणे यांनी प्रभाग क्रमांक १८ मधील या पाच फुटाच्या गल्लीत एकदा यावेच असे कळकळीचे आवाहन या प्रभागातील नागरिक करत असल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील शहेनशहावली दर्गा तलाव व न्यु शहेनशहा नगर परिसरातील रहिवाशांना दिवसातून पाच वेळा नमाज़साठी जाताना ज्या पाच फुटाच्या गल्लीतून जावे लागते त्या गल्ली मधून पलीकडल्या भागातील नाल्याचे गलिच्छ पाणी २४ तास धो-धो वाहते. गलिच्छ वाहणाऱ्या पाण्यातून जाताना नमाज़ींच्या कपड्यांवर हे गलिच्छ पाणी उडते. तेव्हा मशिदीत जाऊन नमाज़ पठण करण्याअगोदर नमाज़ींना आपली विजार किंवा पॅन्ट तीन वेळेस पाण्याने धुणे भाग पडत आहे. मशिदीत जाण्याकरिता पाच फुटाची ही गल्ली जवळचा मार्ग तर आहेच परंतु याशिवाय दुसरा रस्ता नाही म्हणून नाविलाजास्तव नमाज़ींना नालीतील गलिच्छ पाणी वाहणाऱ्या या गल्लीतूनच मशिदीत जावे लागते. परंतु याचे या भागातून बीड नगर परिषदेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या दोन्ही मुस्लिम नगरसेवकांना पदावर असताना आणि आता कालावधी संपल्याने पदावर नसतानाही कुठलेही सोयरसुतक नाही. यामुळे या गल्लीतून वाहणाऱ्या नालीच्या गलिच्छ पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कुठल्याही प्रकारचे कार्य करण्यात आलेले नाही. मुख्याधिकारी ढाकणे साहेब बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून आपण स्वतः जातीने या जागी यावे येथून वाहणाऱ्या या गल्लीतील नाल्याच्या गलिच्छ पाण्याचा अनुभव घ्यावा आणि नंतर यासाठी काय कार्य करायचे ते करावे. असे कळकळीचे आवाहन या प्रभागात राहणारे नागरिक करू लागल्याचे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
स्वर्ग मिळावे म्हणून नमाज़साठी जाताना नरक यातनेचा अनुभव
RELATED ARTICLES