HomeUncategorizedदिव्यांग महिला शौचालयासाठी तक्रार घेऊन फिरते दारोदार

दिव्यांग महिला शौचालयासाठी तक्रार घेऊन फिरते दारोदार

गेवराई : गेवराई शहरातील कोरबू गल्ली भागात राहणाऱ्या दिव्यांग असलेल्या शेख जुलेखा शेख हारून यांना नगर परिषदेकडून शौचालय मंजूर झाले. त्याचे कामही पूर्ण करून वापरही सुरू झाला. मात्र शौचालयाला जाणाऱ्या मार्गावर शेजारच्या व्यक्तीने अतिक्रमण केल्याने, या दिव्यांग महिलेला शौचालयाला जाण्यास अडथळा निर्माण केला आहे. याबाबत सदर दिव्यांग महिला आपली तक्रार घेऊन प्रशासनाच्या दारोदार फिरत आहे.मात्र तिच्या तक्रारीकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने सदर महिला हातबल झाली आहे. या दिव्यांग महिलेने अनेकांकडे तक्रारी केल्या मात्र त्यांनीही दखल न घेतल्याने अखेर सदर महिला टोकाचा निर्णय घेण्याची शक्यता बोलून दाखवत आहे. याकडे तात्काळ प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या शेख जुलेखा शेख हारून राहणार कोरबू गल्ली गेवराई यांनी तहसीलदार सचिन खाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मला नगर परिषदेकडून मोफत शौचालय मंजूर करण्यात आलेले आहे. त्याचा वापर मी व माझे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत.. परंतु शौचालयाला जाणाऱ्या मार्गावर शेजारी राहत असलेल्या कुटुंबाने आपले घर बांधकाम सुरू केले असून, त्यात आपल्या वापरात असलेल्या शौचालयाच्या पायऱ्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. यामुळे आपल्याला शौचालयाचा वापर करता येत नाही. दोन्ही पायाने दिव्यांग असल्याने दुसरीकडेही व्यवस्था नाही. याबाबत शेख जुलेखा शेख हारून या दिव्यांग महिलेने नगर परिषद मुख्याधिकारी यांना अनेक वेळा निवेदन दिली. परंतु त्यावर थातूरमातूर कारवाई करून तिची समजूत काढण्यात आली. काही काळ नगरपरिषदेने सूचना करून सदर बांधकाम बंदही पाडले होते. परंतु आता पुन्हा हे अतिक्रमित असलेले बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या शौचालयाला असलेल्या पायऱ्याच बुजून टाकण्यात आल्या आहेत. आपण दिव्यांग असल्याने शासकीय व प्रशासकीय कार्यालयात वेळोवेळी तक्रारीसाठी जाऊ शकत नाही. तरीही या प्रकरणात नगरपरिषद मुख्याधिकारी, तहसीलदार, यांच्यासोबतच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक गेवराई आणि तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती संघ दिव्यांग विभाग यांच्याकडे याबाबत माहिती देऊन, तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे. परंतु याकडे अध्याप कोणीही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नसल्याने, सदर दिव्यांग महिला शेख जुलेखा शेख हरून या आता हदबल झाल्या आहेत. याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आपण टोकाची भूमिका घेऊ, अशी भावना व्यक्त करून त्यांनी आपली निराशा व्यक्त केली आहे. प्रशासनाने तात्काळ त्यांच्या तक्रारीच्या निवेदनाची दखल घेऊन एका दिव्यांग महिलेच्या शौचालयाचा मार्ग तातडीने मोकळा करावा आणि संबंधितांना कडक आदेश देऊन तंबी देणे गरजेचे आहे. एखादी घटना घडल्यानंतर वराती मागून घोडे नाचवण्यात काहीही अर्थ नाही. सदर प्रकरण गांभीर्याने समजून घेऊन संबंधित महिलेला न्याय देणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments