HomeUncategorizedटिलीमिली आता स्मार्टफोनवर

टिलीमिली आता स्मार्टफोनवर

मुंबई : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) व एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन (एमकेसीएल-केएफ) या संस्थांनी कोरोना काळातील शाळाबंदीच्या दोन शैक्षणिक वर्षात “टिलीमिली” ही महामालिका दूरदर्शनवर प्रसारित केली होती.त्या प्रसारणास महाराष्ट्र शासनाच्या‘एससीईआरटी’चे सहकार्य लाभले होते. सदर महामालीकेत प्रसारित केलेले पहिली ते आठवी इयत्तांच्या सर्व विषयांच्या मराठी माध्यमातील सर्व पाठांवरील हे ८६४ मनोरंजनात्मक कार्यक्रम राज्यभरातील लक्षावधी विद्यार्थी, शिक्षक,पालक व शिक्षणप्रेमींच्या पसंतीस उतरले होते.त्यामुळे ज्ञानरचनावादी शिक्षण घरोघरी पोहोचले. महाराष्ट्राच्या महानगरांपासून तर आदिवासी पाड्यांपर्यंत राहणाऱ्या लक्षावधी विद्यार्थ्यांनी या मालिकेच्या दैनंदिन प्रसारणाचा दोन वर्षे पुरेपूर लाभ घेतला. कोरोना काळात देशात राबवण्यात आलेल्या दूरशिक्षण उपक्रमांमध्ये हा सर्वात कल्पक, परिणामकारक आणी विद्यार्थीप्रिय उपक्रम ठरला. आता ही संपूर्ण महामालिका विद्यार्थ्यांना http://tilimili.mkcl.org/ या संकेतस्थळावरून स्मार्टफोन,टॅब्लेट किंवा संगणकावर कधीही मोफत बघता येईल. संकेतस्थळावर प्रत्येक पाठ ७ ते ८ मिनिटांच्या ३ भागात सादर करण्यात आला असून प्रत्येक पाठ-भागाअखेर दिलेल्या वेचक व वेधक प्रश्नांच्या चाचण्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सोडविता येतील.त्याद्वारे आपले आकलन किती अचूक आहे हे तत्काळ पडताळून बघता येईल व आवश्यक तेथे विशिष्ट पाठ-भाग पुन:पुन्हा बघून, त्यावरच्या प्रश्नांची उजळणी करून,आपले आकलन पालक व शिक्षकांच्या मदतीने अधिक परिपक्व करता येईल. तसेच पाठाआखेर दिलेले पूरक उपक्रमही करून बघता येतील आणी आकलनात अधिक स्पष्टता प्राप्त करता येईल.या सुविधेमुळे गेल्या दोन वर्षात झालेले संभाव्य शैक्षणिक नुकसान मागील कुठल्याही इयत्तेचे पाठ आता घरच्याघरी बघून भरून काढता येईल.तसेच शाळाबंदीमुळे उद्भवलेल्या विस्मरणातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला न्यूनगंड दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागेल.मागील वर्षीच्या पाठांच्या उजळणी- सुविधेमुळे शिक्षकांनाही या वर्षीचे पाठ शिकवण्यातील अडचणी कमी होतील. या संकेतस्थळावर पहिली ते आठवीच्या पाठ्यक्रमावरील एकूण २५९२ एपिसोड्स व त्यावरील सुमारे १६,००० प्रश्न उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे हे सर्व एपिसोड्स ‘यूट्यूब’वरून नव्हे तर ‘एमकेसील’च्या सर्व्हरवरून स्ट्रीम करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना जाहिराती, गेम्स किंवा अन्य व्यत्यय व प्रलोभनांचे अडथळे न येता तसेच त्यांचे लक्ष वारंवार दुसरीकडे न भरकटता एकाग्रतेने व सलग शिकत राहता येतील.पालकही त्यामुळे निश्चिंत राहतील.“टिलीमिली” पाठांमध्ये रटाळ भाषणे कुठेही नाहीत! प्रत्येक पाठ-भागात ‘शिकविण्याला’ फाटा देऊन स्वत: ‘शिकण्याला’ वाव दिला आहे. सहजसोपी मांडणी, बाल-अभिनेत्यांच्या कृतीतून आणी हलक्या-फुलक्या संवादातून स्पष्ट आकलन, रंजक सादरीकरण,वेधक प्रसंग,कसदार अभिनय, कलात्मक नेपथ्य, बाहुल्यांचे खेळ,शॅडो प्ले, चित्रे,प्रतिकृती,प्रयोग, शोध,खेळ,संगीत,गाणी, गप्पागोष्टी या सर्वांची रेलचेल पहायला मिळेल. मुले त्यांच्या कृतींतून आणि परस्परांच्या मदतीने व गरज भासेल तेव्हा शिक्षकांकरवी मिळालेल्या सांस्कृतिक मध्यस्थनातून स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च कशी करतात आणी शिकण्याचा आनंद लुटतात हेही या मालिकेत सतत अनुभवायला मिळेल. या मालिकेच्या प्रत्येक पाठात ज्ञानरचनावादी प्रकिया आणी रंजकता यांचा सुरेख संगम आता स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा संगणकावर अनुभवता येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments