बीड – खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाच्या कामास गेल्या एक वर्षात सुरुवात तर झाली नाहीच शिवाय नियोजित पुलाच्या ठिकाणी खासबाग परिसरातील तरुणांनी मोठ्या मेहनतीने श्रमदान करून बनविलेला कच्चा पूल नदीला आलेल्या थोड्याशा पाण्याने काही भाग वाहून गेल्याने या दोन्ही भागातील नागरिकांना पुन्हा एकदा जोखीम घेत येथून ये-जा करावी लागत आहे. येथे पुलाची अत्यंत आवश्यकता लक्षात घेऊन गेल्या वर्षी बिंदूसरा नदीपात्रात लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलन करण्यात आले होते. मात्र आजपर्यंतही पुलाच्या कामास सुरुवात झाली नाही. पुलाच्या निर्माण कार्यास प्रत्यक्षात सुरुवात व्हावी म्हणून पुन्हा एकदा बिंदुसरा नदी पात्रात लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलन करणार असल्याचे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ आणि सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलयास यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळ्यात आतापर्यंत बिंदुसरा नदीला मोठा पूर आला नसला तरी जे काही पाणी आले आहे त्यात खासबाग परिसरातील तरुणांनी मोठ्या मेहनतीने श्रमदान करून बनविलेल्या कच्च्या पूलाचा जवळपास एक तृतीयांश भाग वाहून गेला. उरलेल्या कच्च्या पुलावरून वाहून गेलेल्या भागातील नदीपात्रातून जोखीम पत्करत खासबाग व मोमीनपुरा भागातील नागरिक ये-जा करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवरील पूल निर्माण करण्यात यावा ही मागणी वारंवार जनतेकडून होत असूनही राजकारणी, मग ते सत्ताधारी असो की विरोधक आणि प्रशासन सुद्धा नुसते कागदी घोडे दामटवत पूल होणार, पूला सोबत बंधारा होणार, अशा प्रकारची मुक्ताफळे प्रसिद्धी माध्यमातून उधळत आहेत. प्रत्यक्षात मात्र येथे नियोजित पूल निर्माण व्हावे याकरिता पूलाच्या बांधकामासाठी आजपर्यंत साधा एक खड्डा सुद्धा खांदण्यात आला नाही. पुलनिर्माणाची गोष्ट तर दूरच.नियोजित पुलाच्या ठिकाणी बिंदुसरा नदी पात्रात गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर २०२१ रोजी आमच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, रमेशराव गंगाधरे, शेख युनूस, संदीप जाधव, शेख मूबीन, मुहम्मद मोईज़ोद्दीन, सय्यद आबेद आदींनी लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलन केले होते. या आंदोलनात या भागातील तरुण सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.बिंदूसरा नदीवरील खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या नियोजित पूलासाठी नदीला मोठा पूर आला की आता पुन्हा एकदा लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलन करणार असल्याचे या पुलासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करणारे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ आणि सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलयास यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
खासबाग – मोमीनपुरा भागातील नागरिकांच्या नशिबी पुन्हा जोखमीचा प्रवास !
RELATED ARTICLES