जातेगाव : प्राथमिक आरोग्य केंद्र हे जातेगाव आणि परिसरातील जनतेसाठी बांधलेले आहे. येथे महिन्याला लाखो रुपये खर्च पगारावर केला जातो. मात्र येथे योग्य सेवा मिळत नाही. या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी आरोग्य केंद्राची पाहणी केली होती. यावेळी शिपाई वगळता एकही डॉक्टर, नर्स, कंपाउंडर अथवा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नसल्याची आणि हे सर्व परगावी रहात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली होती. अँड. देशमुख यांचेकडे जवळपास शंभर नागरिकांनी दवाखान्यातील सुविधांचा पाढा वाचला. सुविधा मिळत नसल्याने उपचार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. जनतेला विनाकारण काम सोडून परगावी दवाखान्यात जावे लागते. डॉक्टर येथे रहात नाहीत. अशा अनेक तक्रारी जनतेने मांडल्या. त्यामुळे देशमुख यांनी ताबडतोब पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. पहाणी दरम्यान केवळ एक शिपाई या ठिकाणी हजर असल्याचे दिसले. एकही डॉक्टर जातेगावात नव्हते. एकही नर्स कंपाउंडर अथवा कर्मचारी दवाखान्यात हजर नव्हते. आज आषाढी एकादशी असल्यामुळे हे सर्व जन बाहेर असल्याचं सांगण्यात आलं. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजणं आवश्यक आहे. मात्र लाखो रुपये पगार घेणारे जर आषाढीचे निमित्त सांगून जनतेचे आरोग्य धोक्यात ठेवत आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी परिस्थितीमध्ये सुधारणा करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे येथे आठ दिवसात काय सुधारणा होते, प्रत्येक शिफ्टचे डॉक्टर तिथे हजर राहतात का ? हे पाहिले. परंतु सुधारणा झाली नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याबाबत दोन वेळा माहिती दिली मात्र त्यांनी कसलेच उत्तर दिले नाही. आरोग्य विभाग असा चालणार असेल, तर या विभागाला जागेवर आणावे लागेल. जनतेला आरोग्य विषयक सुविधा देता येत नसतील तर हे लोक राजीनामा का देत नाहीत ? असाही प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. हजारो लोक जर सरकारी दवाखान्या ऐवजी खाजगी दवाखान्यात गेले तर रुग्णांचे लाखो रुपये विनाकारण खर्च होतील. या सर्व प्रकारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर जातेगावातील जनतेसह आपण स्वतः आंदोलनात उतरू. लोकांना आरोग्याचे उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे अँड. अजित देशमुख यांनी म्हंटले आहे. दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरामध्ये लाक्षणीक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जातेगावच्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत काम करावे, ही आपली मागणी असल्याचे ॲड. देशमुख यांनी म्हटले आहे.
जातेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्णाची हेळसांड
RELATED ARTICLES