केज तालुक्यातील चिंचोली माळी खून प्रकरणातील आरोपी पोलीसांच्या जाळ्यात , सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या पथकाला आले यश
केज : तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील खळबळ माजविणाऱ्या खून प्रकरणी कोणताही पुरावा मागे न ठेवता पसार झालेल्या मारेकऱ्यांचा रेखाचित्रा आधारे तपास करून केज पोलीसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या.या बाबतची सविस्तर वृत्त असे की,दिनांक ११ जुलै सोमवार रोजी चिंचोली माळी ता.केज येथे सायंकाळी सुमारे ७:०० वाजण्याच्या दरम्यान गावापासून एक कि.मी. अंतरावर वरपगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्री. क्षेत्र रामकृष्ण महाराज संस्थांनच्या कमानी जवळ शेतात पत्र्याच्या शेडवजा घर असलेल्या पांडुरंग राऊत यांच्या घरी तोंडाला कपडा बांधलेले अनोळखी व्यक्ती गेले. त्यांनी त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले.पत्नी शशिकला राऊत ही पाणी घेऊन येताच त्या तीन अज्ञात चोरट्यानी तिच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. यावेळी शशिकला मोठ्याने ओरडली म्हणून हिचा नवरा पांडुरंग राऊत पळत आला आणी त्याने चोरट्याशी झटापट झाली. त्यामुळे चिडलेल्या अज्ञात चोरट्यानी पांडुरंग राऊत यांच्यावर चाकू हल्ला केला.चाकुचा वार एवढा जोरदार होता की, छातीच्या खाली मारलेला चाकू पाठी मागील बाजूने आरपार निघाला. या झटापटीत त्याची पत्नी शशिकला राऊत ही देखील जखमी झाली आहे. मारेकऱ्यांनी खून करून पळून जाताना कोणाला दिसू नये आणी ओळख पटू नये म्हणून घराच्या समोर लावलेला विजेचा बल्ब काढून अंधार करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता.चाकूचा घाव वर्मी बसताच पांडुरंग राऊत हे जमीनीवर पडले. त्यांचा अती रक्त स्त्रावाने जागीच मृत्यू झाला.घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. हल्ल्यानंतर ते मारेकरी दुचाकी वरून वरपगाव रोडने पसार झाले होते.या घटनेने जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली होती. मयत पांडुरंग यांची जखमी पत्नी शशिकला राऊत हिच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात दि.१२ जुलै मंगळवार रोजी अज्ञात मारेकऱ्या विरुद्ध गु.र.नं .२८८/२०२२ भा.दं.वि. ३०२,३०७,३९४ आणी ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी पोलीस सर्व बाजूनी तपास करीत होते. परंतु काही पुरावा हाती लागत नव्हता. मग गंभीर गुन्ह्याच्या तपासात हातखंडा तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे,पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्याशी चर्चा करून एका आर्टिस्टकडून फिर्यादीने दिलेल्या माहिती आधारे रेखाचित्र तयार केले. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम यंत्रणा याचा आधार घेत उस्मानाबाद जिल्ह्यातील इटकुर ता.कळंब येथील बोगा पारधी वस्तीवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणी त्यांच्या पथकातील अनिल मंदे, अशोक नामदास,दिलीप गित्ते,महादेव बहिरवाळ, बाळासाहेब अहंकारे, राजू गुंजाळ यांच्या पथकाने राजेंद्र उर्फ शाम मोहन शिंदे याला कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झडप घालून ताब्यात घेतले.आरोपी राजेंद्र उर्फ शाम शिंदे याला केज पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला असता या खुनात तो मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलीसांनी राजेंद्र उर्फ शाम शिंदे याला न्यायालया समोर हजर केले असता त्याला दि. २२ जुलै पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट :- केज पोलीसांनी खून प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी केज पोलीस ठाण्यात भेट देऊन पुढील तपासा संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज पोलीसांचे कौतुक केले आहे.