जळगाव जामोद : तालुक्यातील निंबोरा बुद्रुक फाट्यावरील एका विहिरीत सत्तावीस वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवार, १६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. परंतु पत्नीने आत्महत्या केली नसून, अत्याचार करून तिला जीवे मारल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. तालुक्यातील अकोली येथील करुणा सुरेंद्र वानखडे (२७) ही महिला मागील काही दिवसांपासून मुलांसह खांडवी येथे माहेरी राहत होती. तर महिलेचा पती सुरेंद्र वानखडे हा त्याचा मित्र नीलेश माने रा. मारोड याच्यासोबत विहीर खोदण्याचे काम करत होता. नीलेश माने याच्याकडे सुरेंद्रचे तीन हजार रुपये उसनवारी होते. मागील पाच सहा महिन्यापासून सुरेंद्र मुंबईला कामाला गेला असल्याने त्याची पत्नी करुणा ही माहेरी राहून वडिलांची शेती करत होती. दरम्यान, शेतात गवत झाल्याने निंदणासाठी पैशाची गरज असल्याने तिने पती सुरेंद्रला फोन करून पैशाची मागणी केली असता पतीने नीलेशकडे तीन हजार रुपये आहेत, ते तू मागून घे असे सांगितले. दरम्यान, शुक्रवार, १५ जुलै रोजी तिने पतीला फोन करून सांगितले की, नीलेशने मला पैसे घेण्यासाठी निंभोरा फाट्यावर बोलावले त्यामुळे ती काल निंभोरा बुद्रुक फाट्यावर पैसे घेण्यासाठी गेली. परंतु संध्याकाळ पर्यंत ती घरी न आल्याने तिच्या फोनवर नातेवाइकांनी फोन केला असता, तो लागला नाही. त्यानंतर तिचा शोध घेतला असता शनिवारी सकाळी तीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. निलेश माने याने पत्नीवर अत्याचार करून विहिरीत लोटून तिला जीवे मारले असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुरेंद्रने केली आहे. या प्रकरणी जळगाव ज. पोलिसांनी नीलेश अशोक डोंगरदिवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी निलेश माने यांच्या वर अपराध क्र, ४१६/२२ कलम ३०६ भादवी सह कलम ३ .७ . २ ( V ) अ. जा.ज. अ. प्र. का प्रमाणे गुन्ह दाखल झाला आहे. पुढील तपास उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर हे करित आहे.
विहिरीत आढळला महिलेचा मृत्यूदेह
RELATED ARTICLES