बीड – शहरातील आसेफ़नगर चा मुख्य रस्ता आणि एस.टी.स्टँड ला अर्ध्या तासाच्या पावसाने येत असलेल्या सागरी रूपामुळे नागरिक व प्रवाशांचे होत असलेले हाल व कुचंबांना पाहता या दोन्ही भागासाठी किमान पावसाळ्यात तरी नौका विहार चे टेंडर काढावे, जेणेकरून याद्वारे नागरिकांची रहदारी सुरळीत होईल. असे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले असून येत्या सोमवारी याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे नमूद केले आहे.याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, आसेफ़नगर चा मुख्य रस्ता आणि एस.टी. स्टँड हे दोन्ही भाग शहरातील इतर रस्त्यांच्या मानाने खोल झालेले आहेत. या दोन्ही परिसरातील इतर रस्ते वर असून आसेफ़नगर चा रस्ता व एस.टी. स्टँड खोलात आहे. यामुळे पावसाळ्यात अर्धा तास जरी चांगला पाऊस झाला तर या दोन्ही ठिकाणी कधी गुडघ्या एवढे तर कधी कंबरे एवढे पाणी तुंबते. हे तुंबलेले पाणी कित्येक तास तुंबून असते. जर पाऊस सारखा सुरूच राहिला तर मग विचारूच नका. यामुळे आसेफ़नगर मधील रहिवाशांचेच नाही तर ये-जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे व एस.टी. स्टँड वर प्रवाशांचे हाल व कुचंबणा होते. पाऊस सुरू झाल्यापासून ते पाऊस बंद झाल्यानंतर कित्येक तास हे दोन्ही भाग रहदारीसाठी बंद होऊन जातात. पायी चालणे तर दूर, दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहने सुद्धा येथून जाऊ शकत नाही. तुंबून असलेल्या सागरामुळे ना या भागात जाता येते, ना येथून निघता येते. यामुळे आवश्यक कामे खोळंबतात. ही बाब लक्षात घेता निदान पावसाळ्यात तरी नागरिकांचे हाल व कुचंबना होऊ नये म्हणून या दोन्ही ठिकाणी नौका विहार द्वारे नागरिकांना ये-जा करता यावी म्हणून या दोन्ही भागात नौका विहार साठी टेंडर काढावे आणि शहरवासियांचे जीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा. याकरिता येत्या सोमवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
आसेफ़नगर रस्ता व एस.टी. स्टँडसाठी नौका विहार चे टेंडर काढा – एस.एम.युसूफ़
RELATED ARTICLES