बीड : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. मात्र सदरील यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आहेत. एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात घुसडण्यात आली आहेत. सदरील यादी कोणाच्यातरी राजकीय सोयीसाठी तयार केल्याचा संशय असून या प्रकरणी तात्काळ चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केली आहे. या प्रकरणात प्रशासनाने लक्ष न घातल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.बीड नगरपालिका निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सदर यादीवर दिनांक 1 जुलै पर्यंत आक्षेप आणि हरकती घेता येणार आहेत. प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका आहेत. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे दोन प्रभागात विभागली केली आहेत. काही नागरिक ज्या प्रभागातील रहिवासी आहेत त्या प्रभाग यादीत त्यांचे नाव न येता आजूबाजूच्या प्रभागांमध्ये त्यांची नावे आली आहेत. विधानसभा मतदार संघाच्या अनुषंगाने मतदार याद्यांचे विभाजन करण्यात आलेले असले तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहे. विभाजन करत असताना नेमके कोणते नियम समोर ठेवले गेले ? ज्या अधिकाऱ्यांनी मतदार यादीचे प्रभाग निहाय विभाजन केले आहे त्यांनी चार भिंतीच्या आत बसून हे विभाजन केले आहे का ? याद्या तयार करत असताना निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे योग्य आणि काटेकोरपणे पालन झाले आहे का ? हे तपासणे गरजेचे आहे. मतदार यादी विषयी असलेला संभ्रम आणि घोळ मिटवण्याचा अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तातडीने मतदार याद्यांचे पुनर्विलोकन करावे आणि या सर्व प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केली आहे.
बीड नगर पालिकेच्या प्रारूप मतदार यादीत घोळ ; तात्काळ चौकशी करा – सलीम जहाँगीर
RELATED ARTICLES