केज : शहरातील अंतर्गत भागात अहमदपूर-अहमदनगर व खामगाव- पंढरपूर या दोन महामार्गांचे काम गेल्या तीन वर्षांपासून अतिशय संथ गतीने सुरू असून,या रखडलेल्या कामामुळे वहातुकीची दमकोंडी, नियमित अपघात आणी अतिक्रमणाचा वाढत चाललेला विस्तार हे थांबवण्यासाठी शहरातंर्गत काम तात्काळ पूर्ण व्हावे यासाठी केज विकास संघर्ष समितीने सतत आंदोलने करून पाठपुरावा केला आहे. आंदोलन करताच कंपनीद्वारा तेवढ्यापुरते थोडके काम करून पुन्हा ते काम बंद ठेवले जाते. मात्र अद्याप एचपीएम व मेगा कंपनीने आपली कामे पूर्ण केली नाहीत. रेंगाळलेल्या व निकृष्ट कामामुळे शहरातील पाच युवकांना आपला जीव गमवावा लागला असून, वेगवेगळ्या छोट्या मोठया अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. या रस्त्याची सर्व रखडलेली कामे येत्या २० जून पूर्वी सुरू करून पूर्णत्वाकडे नाही नेल्यास २१ जून रोजी सकाळी ११-०० वाजता केजडी नदी पुलावर जनतेच्या सहभागाने बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा केज समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांनी दिला आहे . या बाबतची सविस्तर माहिती अशी की, केज शहरातील महामार्गाच्या कामाची समस्या गेली तीन वर्षांपासून रेंगाळत सुरू आहे.यासाठी केज विकास संघर्ष समिती सतत पाठपुरावा करत आली आहे. रखडत चाललेल्या कामामुळे होणाऱ्या अपघातात नागरिकांचे बळी जात आहेत, कित्येक जखमी झाले आहेत तर बहुतांशी नागरिकांचे धुळीमुळे व खड्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे शहर अंतर्गत भागातच या दोन्ही कंपन्या आपली कामे पूर्ण का करत नाहीत हाच मोठा प्रश्न आहे. या विलंबामुळे शहरातील दोन्ही चौकांचे नव्याने बांधणी, सुशोभीकरण, दोन्ही महामार्गावर पथदिवे व नियम व अटीनुसार कंपन्यांनी करावयाचे वृक्षारोपण इत्यादी कामे खोळंबली आहेत. केज तालुका हद्दीत असणारा मांजरा नदी लगतचा खराब रस्ता मुख्य पूल वाहतुकीस उपलब्ध होईपर्यंत सुस्थितीत करणे गरजेचे आहे. साने गुरुजी निवासी विद्यालय ,धारूर रोड जवळचा पूल,उपजिल्ह्या रुग्णालय केज जवळचा चढावरील पूल,कदम वाडी पाटी जवळील पूल इत्यादी ठिकाणी रोड दबल्यामुळे रस्ता धोकेदायक बनला आहे; तो दुरुस्त करणे गरजेचे आहे. या शिवाय कोरेगाव नदी पूलाला लागून पडलेली मोठी भेग दुरुस्त करणे गरजेचे आहे. ही सर्व कामे दोन्ही कंपन्यांनी २० जून पूर्वी सुरू करून पूर्ण न केल्यास २१ जून रोजी सकाळी ११-०० वाजता केजडी नदी पुलावर जनतेच्या सहभागाने बेमुदत रस्ता रोको आंदोलन करणार आहे. या निवेदनावर हनुमंत भोसले,नासेर मुंडे,जे.डी. देशमुख इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत. अतिक्रमण उठवा. केज शहरातील तालुक्याची सर्व मुख्य कार्यालये एकाच ठिकाणी व एकाच दोरीत आलेली आहेत परंतु ही सरकारी कार्यालये अतिक्रमणधारकानी पूर्णपणे वेढलीआहेत.अतिक्रमणामुळे सरकारी कार्यालयांची वाट लागली असल्याचे चित्र आहे. अतिक्रमणाच्या कोंडीमुळे रस्त्याची कामे मोकळेपणाने व नियमानुसार करणे कंपन्यांना अवघड झाले आहे .ही परिस्थिती विचारात घेऊन प्रत्येक कार्यालयाच्या प्रमुखाने आपल्या कार्यालया समोरचे अतिक्रमण काढून घेण्यात यावे.केज तहसीलदार यांनी आपल्या तहसील हद्दीतले अतिक्रमण सक्तीने काढावे.गटविकासाधिकारी यानी केज पंचायत समितीचा कोंडलेला श्वास मोकळा करावा तर शिवाजी चौकातली अतिक्रमणे काढून चौकाची रुंदी वाढवणे गरजेचे आहे. या सर्व समस्या घेऊन केज संघर्ष समितीने दि.२१ जुन रोजी हल्लाबोल करत असल्याचे निवेदन दिले आहे.
एचपीएम कंपनीच्या विरोधात केज संघर्ष समितीचा दि.२१ रोजी पुन्हा एकदा हल्लाबोल
RELATED ARTICLES