HomeUncategorizedशासन-प्रशासनासह जर तुम्ही चुकलात तर तुमच्या पाल्यांचे भविष्य अंधकारमय - एस.एम.युसूफ़

शासन-प्रशासनासह जर तुम्ही चुकलात तर तुमच्या पाल्यांचे भविष्य अंधकारमय – एस.एम.युसूफ़

बीड – सध्या शासकीय-प्रशासकीय स्तरावर कोरोना च्या चौथ्या लाटेच्या नावाने शाळा, महाविद्यालय कुलूपबंद करण्याच्या हालचालीला सुरुवात झालेली दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासनासह जर तुम्ही चुकलात तर तुमच्या पाल्यांचे भविष्य अंधकारमय असेल असे स्पष्ट मत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांच्या पालकांसाठी शिक्षणमित्र तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, शाळा बंद ठेवून पुन्हा एकदा कोरोना ची भीती वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी आजपर्यंत कितीही रोग आले आणि गेले परंतु कोरोना सारखी परिस्थिती कधीही कोणत्याही शासन-प्रशासनाने निर्माण केली नव्हती. रोग राहिला एकीकडे परंतु त्याचे नाव पुढे करून राज्यात व देशातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये जी परिस्थिती निर्माण केली जात आहे त्यामुळे सध्या शिक्षण घेत असलेली पिढी तरुण झाल्यावर नेमकी काय करणार ? हा एक मोठा प्रश्न असून याचे उत्तर भविष्यात येणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे नसेल आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडेही नाही. गेल्या तीन वर्षात बंद शाळा, महाविद्यालय व व्यवसाय आपण सर्वांनी पाहिलेच आहे. आत्ताचे सत्ताधारी सत्तेचा उपभोग घेत आहेत. पुढे चालून ही वेगवेगळे राजकारणी सत्तेचा उपभोग घेत राहणार यात शंका नाही. परंतु यांच्या नाकर्तेपणामुळे निव्वळ एका रोगाचे नाव पुढे करून शाळा व महाविद्यालयांना टाळे लावण्याचे पाप केले जात आहे. यांच्या अशा या उपटसुंभ निर्णयाला वेसण घालण्याची वेळ आली आहे. जर शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याच्या निर्णयाला जनतेने उठाव करून वेळीच वेसण घातली नाही तर आज शिक्षण घेत असलेली पिढी तरुण होऊन जेव्हा उपजीविकेसाठी नोकऱ्या शोधतील तर त्यांचे शिक्षण व्यवस्थित न झाल्याने त्यांना नोकऱ्या मिळविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होता येणार नाही. याला अपवाद नक्कीच असतील ते म्हणजे धनदांडग्या कुटुंबातील तरुण-तरुणी. ते आर्थिक पातळीवर सधन असल्याने पैशाच्या बळावर काहीही साध्य करू शकतील आणि सध्याही करतातच. परंतु सर्वसामान्य कुटुंबातील तरुण-तरुणींचे काय ? याचा विचार करा. त्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत. नोकऱ्या नाहीत म्हणून उद्योग करण्याकरिता सुशिक्षित बेरोजगार म्हणून शासनाकडे कर्ज मागायला जातील तर मेंदू विना कारभार हाकणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी बँकिंग व्यवस्था सध्याच चौपट करून टाकली आहे. भारतीय रिझर्व बँक सारखी देशाची सर्वात मोठी बँकिंग व्यवस्था सुद्धा डबघाईला आणून सोडली आहे. तेव्हा पुढे चालून शासन आणि बँकासुद्धा आज शिक्षण घेत असलेल्या पिढीला ती तरुण झाल्यावर व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्याच्या अवस्‍थेत नसेल. अशावेळी आज शिक्षण घेत असलेली पिढी नोकरी आणि व्यवसाया विना सैरावैरा झालेली असेल. यामुळे कालांतराने ही पिढी पुढे चालून कोणते पाऊल उचलेल ? काय करेल ? याचे उत्तर जरी भविष्यात दडलेले असले तरी आजमितीला त्यांच्या शाळा व महाविद्यालयांना कोरोना च्या नावाखाली बंद ठेवणे सध्या शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकांच्या आणि एकूणच समाज व्यवस्थेच्या हिताचे नाही. म्हणून आता वेळ आली आहे शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय जर घेण्यात आला तर त्या विरोधात उठाव करण्याची. दुरगामी दुष्परिणाम करणारा असा बिनडोक निर्णय मोडून काढण्याची. असे जर केले नाही आणि एका रोगाच्या नावाने स्वतःला व शिक्षण घेणाऱ्या आपल्या पाल्यांना घरात कोंडून घेतले तर मात्र आपल्या पाल्यांच्या भविष्यात होणाऱ्या कुचंबनेला पालक म्हणून आपणच दोषी असताल. शासन-प्रशासन याची जबाबदारी घेणार नाहीत हे लक्षात घ्या. शासन-प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांबाबत आज घेतलेला चुकीचा निर्णय येणाऱ्या तरुण पिढीसाठी फार मोठा नुकसानकारक असणार यात दुमत नाही. असे स्पष्ट मत शिक्षणमित्र मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments