इसलामपूर : आशियाई महामार्गावरील कासेगाव येथील येवलेवाडी फाटा येथे कार व कंटनेरचा भीषण अपघात झाला.या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या मार्गावर ही दुर्घटना घडली असून गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.अपघातातील मृत जयसिंगपूर येथील आहेत. अरिंजय आण्णासो शिरोटे (वय ३५ वर्ष), स्मिता अभिनंदन शिरोटे ( वय ३८ वर्षे), सुनिशा अभिनंदन शिरोटे ( वय ९ वर्षे), विरेन अभिनंदन शिरोटे (वय ४ वर्षे), पूर्वा अभिनंदन शिरोटे ( वय १४ वर्षे) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. हे कुटुंब कारमधून पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. यावेळी कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे कार रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडकली. या अपघातात कारमधील ५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २ जण जागीच ठार झाले, तर ३ जण उपचारासाठी दवाखान्यात दाखल करताना मृत्यू पावले. कासेगावजवळ झालेल्या या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. गाडीचा वरील टप आणि दरवाजे पूर्णपणे तुटलेले होते. वरचा भाग पूर्णपणे उडाला होता. तर आतील सीटचा भागही तुटलेला होता. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
