बीड : राज्यात विधी सेवा प्राधिकरण जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यरत आहे. गरीब आणि गरजूंना कायदे विषयक अडचण निर्माण होत असेल तर प्राधिकरण त्यांना मोफत सेवा पुरवते. त्याच प्रमाणे प्राधिकरणामार्फत दाखल आणि दाखल पूर्व तंटे मिटविण्यासाठी लोक न्यायालयाचे देखील आयोजन केले जाते. वाद निवारण करून सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्राधिकरण कार्यरत असल्याचे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय न्यायाधीश श्री. सिद्धार्थ एन. गोडबोले यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख होते. जन आंदोलना मार्फत मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचे तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज या विषयावर गोडबोले साहेब बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, न्यायापासून कोणताही गरीब व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी शासना मार्फत या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. चांगले वकील देखील गरीबांना मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. त्याच प्रमाणे अनेक मोठे मेळावे घेऊन हजारो लोकांना, त्यांना शासना मार्फत उपलब्ध असलेले लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न देखील प्राधिकरणाने मोठ्या प्रमाणात केला असून हजारो लोकांना आवश्यक असलेले प्रमाणपत्र अथवा सेवा मिळवून देण्याचे काम केले आहे. यावेळी बोलताना अँड. देशमुख म्हणाले की, विधी सेवा प्राधिकरण हे न्यायालयातील वाद कमी व्हावेत, तंटे आपापसात मिटवावेत, यासाठी प्रयत्न करते. यात कार्यकर्त्यांचाही सहभाग वाढला पाहिजे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी तंटे मिटविण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे ही ते म्हणाले. यावेळी जवळपास दीडशे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
विधी सेवा प्राधिकरण गरजूंना मोफत विधी सेवा पुरवते ; न्यायाधीश सिद्धार्थ गोडबोले यांचे प्रतिपादन..!
RELATED ARTICLES