संबंधित घटनेतील दोषीवर कडक कार्यवाही होणार – धनंजय मुंडे
मुंबई : अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटनेत एका युवतीने आत्महत्या केली असून, या प्रकरणातील फरार आरोपीला तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. पट्टीवडगाव येथील एका महाविद्यालयीन तरुणीने एका शेजारील मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे वृत्त समजले असून, या घटनेची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. या पद्धतीची प्रकरणे बीड जिल्ह्यात खपवून घेतली जाणार नाहीत, संबंधित घटनेची सखोल चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून देण्यात कोणतीही कसर केली जाणार नाही. सदर प्रकरणातील आरोपीवर कठोर शासन केले जाणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.