केज : शहरामध्ये एका ६६ वर्षीय वृद्धाला थंड पेय आणी केळीतून गुंगी येणारे औषध खायला व प्यायला देऊन त्याच्या हाताच्या बोटातील ६० हजाराच्या रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात इसमाने लांबविल्या होत्या.त्या प्रकरणातील आरोपी तपासी अधिकारी श्री.राम यादव यांनी नेकनूरच्या बाजारातून ताब्यात घेतला.या घटनेची सविस्तर माहीती अशी की,दिनांक ५ एप्रिल२०२२ मंगळवार रोजी केज तालुक्यातील बनकरंजा येथील श्री. धर्मराज थोरात हे कानडी रोड लगतच्या विजय भन्साळी यांच्या विजय कृषी सेवा केंद्राच्या समोर थांबले असता सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने श्री. धर्मराज थोरात यांना त्या अनोळखी व्यक्तीच्या मुलीची सोयरीक जुळवायची आहे.अशी बतावणी केली.पाहुणे येई पर्यंत चहापाणी पिण्याचा बहाना केला.श्री.धर्मराज थोरात यांना त्या अनोळखी व्यक्तीने स्प्राईट या थंड पेयाच्या बाटलीत गुंगी येणारे औषध मिसळून ते प्यायला दिले. तसेच त्यांनी केळी मध्ये पण गुंगी येणारे औषध खायला दिले.नंतर ते दोघे कानडी रोड वरुन क्रांती नगर जवळच्या केजडी नदीमधुन पाटलाचे शेतात गेले. तेथे गेल्या नंतर धर्मराज थोरात यांना गुंगी येताच त्याचा गैरफायदा घेऊन त्या अनोळखी ठगाने श्री.धर्मराज थोरात यांच्या उजव्या हाताच्या बोटातील प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाच्या जुन्या दोन अंगठ्या काढून घेऊन पोबारा केला.श्री.धर्मराज थोरात यांना त्यांच्या हातातील दोन अंगठ्या त्या ठगाने फसवणूक करून लुटल्याचे माहीत होताच दिनांक. ८ एप्रिल २०२२ रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार गु.र.न.१११/२०२२ भा.दं.वि. कलम ३२८ व ३७९ नुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे पुढील तपास तपासी अधिकारी श्री. राम यादव हे करीत होते.दरम्यान तपासी अधिकारी श्री.राम यादव यांनी न्यु मयुर पारस स्वीट होम मधील सीसीटीव्हीचे गुन्हेगार व धर्मराज थोरात यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले आणी त्या आधारे बीड,उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील तपास यंत्रणेला सतर्क केले होते.दिनांक १ मे २०२२ रोजी एका गुप्त खबऱ्याने नेकनुरपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.विलास जाधव यांना एका संशयित इसमाची माहिती दिली. त्या नंतर पोलीस उपनिरीक्षक श्री.विलास जाधव आणी तपासी अधिकारी श्री. राम यादव यांनी त्या संशयित इसमास ताब्यात घेवून त्याची झडती घेतली.त्यावेळी त्याच्या जवळ एका पिशवीत शीतपेयाची अर्धी बाटली आढळून आली. सिसीटीव्ही फुटेज व तो संशयीत यात साधर्म्य असल्याचे जाणवल्याचे निष्पन्न होताच त्याला ताब्यात घेवून आधीक चौकशी केली.तो भामटा हा लातूर जिल्ह्यातील वांगजी ता. औसा येथील राजेंद्र लांडगे हा आहे.अत्यंत शिस्तबध्द आणी कसोशीने तपास करून पोलीस नाईक श्री.राम यादव यांनी नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.विलास जाधव यांच्या मदतीने थंड पेयात गुंगी येणारे द्रव टाकून ते पिण्यास देवून लुटणारा भामटा राजेंद्र बिरुदेव लांडगे याला ताब्यात घेतले.त्या भामट्याला केज पोलीस केज न्यायालयात हजर केले असून त्याला न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी दिली असुन त्याच्या कडून अशा प्रकारच्या अन्य गुन्ह्याची माहिती मिळणार असुन केज पोलिस पुढील तपास करीत आहेत.

