बीड : जिल्ह्यातील बालविवाहाच्या सामाजिक समस्येची सोडवणूक करताना महिला व मुलींच्या सुरक्षेबरोबरच मुला-मुलींमधील भेद मिटविण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे असून, यादृष्टीने कुटुंब हा घटक केंद्रस्थानी मानून शासकीय यंत्रणांनी काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे केले. जिल्हास्तरीय बालविवाह निर्मूलन कृती समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, ‘सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंजेस’चे निश्चल कुमार, अशासकीय सदस्य अतुल कुलकर्णी, सोनिया हंगे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, आपल्या समाजातील निम्मी लोकसंख्या महिलांची असून त्यांच्या सक्षमीकरणाशिवाय आपल्या देशाचा संपूर्ण विकास होऊ शकणार नाही. बालविवाहसारख्या सामाजिक समस्यांच्या जोखडातून मुक्ती मिळविण्यासाठी मुली व महिलांचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सबळीकरण करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जावे. ते पुढे म्हणाले, बीड जिल्ह्यात बाल विवाह प्रतिबंधासाठी काम करताना सर्व विभागांनी समावेशक भूमिका घेतली पाहिजे, या दृष्टीने आवश्यक विभागवार कृती आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणामध्ये कार्यवाही करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पवार म्हणाले, बाल विवाह समस्येच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम केले जाईल. यासाठी महिला व बाल विकास विभाग, शिक्षण, आरोग्य, पंचायत विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना या विभागांच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी पावले टाकण्यात येतील. यादृष्टीने या वेळी त्यांनी संबंधित विभागांना काम करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीमध्ये एसएसबीसीचे निश्चल कुमार यांनी प्रदीर्घ सादरीकरण केले व शासकीय विभागांच्या वतीने बालविवाह निर्मूलनसाठी जिल्हा कृती आराखडा तयार व्हावा, या दृष्टीने सूक्ष्म रूपरेखा सादर केली. याप्रसंगी पोलीस विभाग, क्रीडा, शिक्षण, महिला व बाल विकास तसेच अशासकीय सदस्य यांनी विचार मांडले. बीड जिल्ह्यात बालविवाह प्रथा रोखण्यासाठी उपायांची माहिती देताना विभागनिहाय कार्यवाहीची माहिती दिली.
बालविवाह प्रथा निर्मूलनासाठी प्रबोधन आवश्यक – जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
RELATED ARTICLES