बीड : शहरात तसेच जिल्हा पातळीवर कार्य करणाऱ्या परंतु विखुरलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यकर्त्यांची संघटना निर्माण करायला हवी. याकरिता धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, ज्येष्ठ स्तंभलेखक शिवाजीराव कवठेकर मामा आणि भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणण्याकरिता मुळापर्यंत घाव घालून भल्या-भल्यांना घाम फोडणारे ॲड. अजित देशमुख या सर्वांनी मिळून एकत्र येत सामाजिक कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र संघटना निर्माण करण्यात पुढाकार घ्यावा. जेणेकरून जनहितास्तव सामाजिक कार्यकर्त्यांची ताकद वाढेल. असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, बीड जिल्ह्यात पूर्वीपासून सामाजिक कार्यकर्त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिलेले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचा एक मोठा इतिहास जिल्ह्याला लाभला आहे यात दुमत नाही. मात्र आता गेल्या काही वर्षात राजकारणासह शासकीय-प्रशासकीय स्तरावर एवढा बदल झाला आहे की, आता राज्य असो की देश ! एकाच पक्षाचे सरकार बहुमताने येत नाही व पुढेही येण्याचे लक्षण नाही. म्हणून आता खिचडी सरकारमुळे जनतेला मिळणे आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी सुविधांसाठी सुद्धा शासन-प्रशासनाकडे दाद मागण्याकरिता सर्वसामान्य जनतेसाठी कळकळ असणार्या सामाजिक कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून धरणे, आंदोलने, उपोषणे, मोर्चे वगैरे करावे लागतात. वेळप्रसंगी न्यायालयात जनहित याचिकाही दाखल कराव्या लागतात. यासाठी गेल्या काही वर्षांपासून स्वतःला समाजकार्यात झोकून देणाऱ्या अनेक समाजसेवकांपैकी डॉ. गणेश ढवळे हे जिल्ह्यातील लिंबागणेश सारख्या एका छोट्याशा ग्रामीण भागातून पुढे येत जिल्हाभरातील तळागाळातल्या जनतेचे प्रश्न हाताळत आहेत. न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. याकरिता ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दर सोमवारी विविध प्रश्न व मुद्दे घेऊन आंदोलने करतात. डॉ. संजय तांदळे हे गोरगरीब कुटुंबातील उपवर मुला-मुलींचे लग्न जुळविण्यासाठी वधु-वर मेळावे घेतात. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करतात. ऊस तोड कामगारांच्या तसेच इपीएस-९५ अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी सातत्याने लढा देत आहेत. शिवाजीराव कवठेकर मामा हे अभ्यासू तसेच कोणताही मुद्दा हातात घेतल्यावर तो तडीस नेण्याकरिता सातत्याने पाठपुरावा करताना दिसतात. मग तो मराठवाड्याचा पाणी प्रश्न असो की, ओबीसी आरक्षणामध्ये इतर समाजावर होणारा अन्याय असो. ॲड. अजित देशमुख हे वकिलीचा व्यवसाय सांभाळतानाच जिथे कुठे भ्रष्टाचार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास येते, तिथे ते त्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन भ्रष्टाचाऱ्यांना शासन करण्यासाठी न्यायालयीन लढा देतात. वर उल्लेख केलेल्या चारही सामाजिक कार्यकर्त्यांसह बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अनेक सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी झोकून देऊन काम करताना दिसतात. परंतु हे सर्वजण आपापल्या परीने वेगवेगळे लढे देतात. त्यांच्या लढ्याला प्रत्येक वेळी यश येईलच असे नाही. कारण ते एकट्याने लढतात. जर या सर्वांनी मिळून सामाजिक कार्यकर्त्यांची एक अधिकृत व स्वतंत्र संघटना निर्माण करून प्रत्येक लढा एकत्रितरीत्या लढल्यास सामाजिक कार्य करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची ताकद तर वाढेलच शिवाय जनहितासाठी उचललेल्या मुद्यांना यश येण्याचे प्रमाणही वाढेल. तेव्हा ही बाब लक्षात घेऊन डॉ. ढवळे डॉ. तांदळे कवठेकर मामा आणि ॲड. देशमुख यांनी सामाजिक कार्यकर्त्यांची एक स्वतंत्र संघटना निर्माण करावी. असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या पत्रकातून केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांची स्वतंत्र संघटना निर्माण व्हावी – एस.एम.युसूफ़..!
RELATED ARTICLES